विश्वास आणि बुद्धिमत्ता
एखाद्या विचारधारेवर विश्वास ठेवताच आपण बुद्धिमत्ता वापरणं थांबवतो का? श्रद्धा, आसक्ती आणि स्वतःची ओळख यांवरील चिंतन.
तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवता त्याक्षणी तुमची बुद्धिमत्ता वापरणं बंद करता. कारण तुम्ही त्याचेच गोडवे गायला लागता. विश्वास आणि बुद्धिमत्ता जरी सारखे वाटत असले तरी विभिन्न आहेत. विश्वास (श्रद्धा) ही पालकांसारखी बुद्धिमत्तेला जन्म देते, संवर्धन करते, आणि स्पष्ट "विचार" समोर आणते.
एखादी विचारधारा आपल्याला आवडते मग आपण हळूहळू त्या विचारधारेचे वारसदार बनायला लागतो म्हणजेच आपलं स्वतःचं वेगळेपण आपण दुर्लक्षित करतो. कोणत्याही एकाच धर्म, व्यक्ती, वस्तू, कृती, घटना आणि विचारांना पसंत करणे ही आपली खरी ओळख विसरणं होय. आपण मुक्तपणाने जन्मतो कोणत्याही ओळखीशिवाय. परंतु वरील घटकांच्या बद्दल असणारी आसक्ती आपली ओळख विसरायला कारणीभूत ठरते.
मग तुम्ही म्हणाल नेमकं आपली ओळख काय? तर याचे उत्तर आपली ओळखच मुळी नाही. जडणघडणीच्या बाबतीत आपण मुळात असंच जगलं पाहिजे. कोणत्याही धर्म, व्यक्ती, वैचारिक बाबी आवडल्या तर त्यांचं मंथन करून ज्या त्यावेळी स्वीकार केला पाहिजे. परंतु जीवनभर तीच विचारधारा घेऊन जगू नये अन्यथा बहुआयामी विश्वाचे दृश्य आपल्या नजरेत मावणार नाही. तसेच आपल्या विवेकाला पटलं नाही ते सर्व ज्या त्या क्षणी सहज सोडून दिलं पाहिजे. म्हणजेच श्रद्धा, विश्वासांकडे झुकतं माप न देता बौद्धिक विकास थांबवलं नाही पाहिजे.
-प्रा. रोहित नाईक
Professor Roheit Naik answers them in a private consultation.
For guidance and reflection only; not medical, legal or financial advice.